माझ्या कवितेची फजिती (भाग-३)

🌹🌹🌹🌹🌹🌹
माझ्या कवितेची फजिती
🌷🌷🌷🌷🌷🌷
       (भाग-३)
*****************
…नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
काही दिवसांपूर्वी आमच्या एका नातेवाईक मुलाचं लग्न करायचं ठरवलं अन मी मुलासोबत एका गावात मुलगी पहायला गेलो होतो!मुलगी नटून थटून  हातात नाष्टा घेऊन आली होती!हातातली पोह्याची ताटली देत असतांना तिचे हात थरथरत होते!घाबरीघुबरी झालेली दिसली होती!आमचे पोहे खाऊन झाले तसे मुलगी चहा घेऊन आली! तिच्या हातातला कप बशीवर थुडथुड!!!थुडथुड नाचत होता!कपातला चहा बशीत नाचत, सांडत होता!मुलीला घाम फुटला होता!ती पहिल्यांदाज वधू परीक्षा देत होती!अशा कठीण प्रसंगाला सामोरी जात होती म्हणून घाबरली असावी!कपातला चहा बशीत सांडला होता!सांडलेला चहा भावी वर सुरके मारत पीत होता!🌷

मुलाला मुलगी पसंत पडली होती!लग्न धुमधडाक्यात पार पडले होते!काय हे स्त्री जीवन??परीक्षाच परीक्षा!आयुष्यभर परीक्षा!असो..तर बंधूंनो मी ही माझ्या कवितेचा बाप होतो!कविता माझं अपत्य होतं!चार चौघात तिचा उद्धार करीत होतो!मी कविता गात होतो!माझी व्यासपीठावरील अवस्था त्या नव वधूमुलींसारखीच झाली होती!घामाघूम झालो होतो!कविता सूर विसरली होती!🌷

व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे.. प्रसिध्द कवी बंडा जोशी सर!मिलिंद जोशी सर!अरुण कटारे सर..माझी केविलवाणी अवस्था पहात होते!माझ्यावर दयाभाव दाखवत कदाचित दुर्लक्ष करीत होते!कविता कवीचा प्राण असते!तिच्यावर गर्व असतो कवीला!पण माझ्याच कवितेमुळे माझं गर्व हरण झालं होतं!माझीच कविता माझ्यावर रुसली होती!नाराज झाली होती!ताल सूर विसरली होती!बेसूर झाली होती!🌷

प्रसंग होता पती-पत्नीच्या विवाह दिनाचा!..कवी नरके सर आणि सौ.ताईसाहेबांच्या विवाहाला ३९ वर्ष पूर्ण झाल्याचा!दिनांक१२मे रोजी ४०व्या वर्षात पदार्पण केल्याचा!धुंदीत चंद्र शोधण्याचा!गुलाबी क्षण शोधण्याचा!माघारी फिरुनी गतकाळात जाण्याचा!प्रसंग जणू नवविवाहाचा!त्यात हृदय मुक्तपणे उधळण्याचा!क्षण आनंदी,मनोहारी जगण्याचा कवितेतून स्वर्ग हाती लागण्याचा!स्वप्न साकार होण्याचा हा प्रसंग आनंद सागरात न्हाऊन निघणारा होता!🌹

माझी कविता प्रेमाच्या
 बाजारी जाऊन गुलाब, मोगऱ्याला ओंजळीत घेऊन निघालेल्या संसार सुखाचा आनंद घेणारा आणि पावित्र्याचं चंदन आपल्या भाळी लावलेल्या संसारी जोडीचा होता!माझी कविता सादर करतांना तशीच व्यक्त व्हायला हवी होती!कशी ती बघा.....
"तू आहेस म्हणुनी 
हा वसंत फुलला आहे
अंगणी आपुल्या तुळशी
हवेत झोका घेते आहे!🌹

तुझ्यामुळे कानावरी
भक्ती गीत ऐकू येते
पाषाण हृदयी मजला
तू देवा जवळी नेते...!🌹

तुझ्या डोळ्यातला डोह
कधी ओथंबूनी वाहतो
हृदय सापडे ना मजला
मी शोधूनि पहातो.....!"🌹

या रचनेतून पती-पत्नीच्या प्रेमाला उत्तम झळाळी आली असती!एकमेकांत जीव ओतलेल्या जोडीची महानता दर्शवता आली असती!आनंद डोहात उडी मारता आली असती!या वयात देखील ४०वर्ष संसार पार केलेल्या जोडीचा स्वर्गीय स्वप्नांच्या दुनियेतील आनंद कवितेतून मांडता आला असता!सुखाच्या सुरेख कल्पनेत सुंदर तारे तोडून आणले असते!🌹 

मी अपरिपक्व कविता सादर सादर करण्याच्या मोहात पडलो!दोन दिवसांपूर्वी अर्धवट शिल्प साकारलेली रचना सादर करण्याच्या मोहात उतावीळ झालो होतो!पण कविता माझ्यावर रुसली असावी!नाराज झाली असावी!चाल विसरायला तिनेच गुप्त कारस्थान रचले असावे!मी बेसूर कवितेचा भेसूर गायक झालो!भेसूर गीतकार झालो!मी माझीच केविलवाणी अवस्था करून घेतली होती!ती कविता अशी सादर झाली होती!बघा!आंसू आणि हसे दोघेही माझ्या पाठीमागे लागले होते!

"मी साठ सालचा बुढढा
मुखी दातांची खिडकी
पत्नीच्या धाकात माझ्या
छातीत भरते धडकी...!😥

खोल डोळ्यांवर चष्मा
डोक्यावर चुन्याची सफेदी
पत्नी पाहिल्यावर माझ्या
छातीत भरते धडकी..!😢

अंगी पंचवीशीचा जोश
जुनी हवेली मोडकी
ही साठीची हवेली...
पुढे होऊन जाईल पडकी!"😥

ही कविता म्हातारपणाला साद घालत होती!जीर्ण शिर्ण शरीराचा उगीचच गौरव करीत होती!असाह्यपणे संध्याकाळ पहात होती!क्षितिजावर पाऊल ठेवणाऱ्या उगवत्या सुर्याकडे पाठकरून उभी होती!काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्रीचा चंद्र शोधण्यात गर्क होती!😥

प्रेमात पडलेली कविता विरहात तळमळावी!मिलनाची आस धरणारी असावी!जगण्याचा प्रकाश हाती देणारी असावी!रोज सकाळी उगवत्या सुर्यदेवाच्या साक्षीने मांगल्याचा सुमधुर सूर कानी पडणारी कविता असावी!पती-पत्नीच्या पवित्र नात्यांचा सन्मान करणारी संस्कारी कविता असावी!🌷

मी कविता हरवून बसलो होतो!मुख डफ झाला होता!महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवींच्या समोर माझी जणू तमाशातील बारी सुरू होती!हजेरी सुरू होती!सूर हरवलेली कविता रसिकांच्या कानी पडत होती!अशी कविता रसिकांच्या काळजाला साद घालीत नसते!बेसूर कविता परिघाबाहेर फेकली जात असते!परीघ मात्र अभेद्य असतो!भक्कम तटबंदी असतें! माझ्यासारखे अनेक घुसखोर येत असतील!😥

परिघावर उभे असलेल्या दर्जेदार सारस्वतांच्या तटबंदीवर!त्यांच्या कणखर मनावर, छाताडावर माझी कविता आदळत होती!माझ्या भेसूरतेला पिटाळून लावणारा कवितेचा गाभारा माझ्यासाठी रिताच राहिला होता!मी लज्जेने,शरमेने गलितगात्र झालो होतो!माझ्याच कवितेने मला चितपट केले होते!रसिकांना साक्षीने,कवितेच्या प्रांगणात मी सपशेल हरलो होतो!काळजात हरलेपणाची जखम खोल होती!माझी कविता जिंकली होती!मी मात्र सपशेल हरलो होतो!लोकलाजे हसून हासे झाले होते!माझ्याच कवितेने माझी फजिती केली होती!
🙏🌷😥🙏🌷😥😅
*******************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-१६मे २०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol