मावळतीच्या सुर्यासंगे

🌹मावळतीच्या सुर्यासंगे🌹
       *************
 .......नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
आपणास संक्रांतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!संक्रांत गोड व्हावी!नात्यागोत्यात मधुर संबंध व्हावेत!घरादारात आनंदाचा सुवासिक दरवळ पसरत रहावा याचं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो!🌹

रोज उगवतीला उठतो आहे!
संवाद मनीचा फुटतो आहे!
'साज' सकाळी नटतो आहे!
!.अन..अन मावळतीचे रंग कोणीतरी भरतो आहे!🌹

 दररोज प्रातःसमयी पूर्वेकडे तांबूस रंगाची लाली क्षितिजाच्या ओठांवर स्पष्ट दिसत असते!हळूहळू क्षितिजाचे ओठ विलग होत असतात!तांबूस लालीच्या सुंदर रांगोळीत प्रकाश किरणे नाचत असतात!उगवत्या किरणांची उधळण क्षितिजाच्या मुखावर!आभाळ मुखावर होतांना दिसत असते!कोमल शांत!तजेलदार सूर्यकिरण!नयनमनोहर वाटत असतात!उधळणाऱ्या वासरागत वाटत असतात! तरुण-तरुणी सारखे वाटत  असतात!खळखळत्या झऱ्यागत वाटत असतात!उमलणाऱ्या फुलांच्या कळ्यागंत वाटत असतात!प्रसन्न अन हासरे वाटत असतात!🌹

उगवती सकाळ उत्साहाने भरलेली असते!नयनरम्य असते!टवटवीत असते!सूर्य शांत शीतल असतो!हसऱ्या फुलासारखा असतो!पिवळाधमक असतो! पूर्वदिशा हसरी गुलाबी,तांबूस पिवळी असते!🌷

 ..तोच सूर्य दुपारी चटका देत असतो!अंग भाजून काढीत असतो!डोक्यावर चटक्याचा तवा ठेवीत असतो!दुपार ही रागीट पण आतून खोबऱ्याचं थंडगार पाणी असते!दुपार...हवी हवीशी वाटते!नकोशी ही वाटते!सृष्टी सुर्यदेवास सामोरी जात असते!तप्त आलिंगणात एकजीव होत असते!एकरूप होत असते!त्याच्यातचं सामावून जाते!एकजीव झालेली सृष्टी तप्त उन्हातही तृप्त होते!सूर्य-पृथ्वीचं प्रेमळ मिलन होतं असतं!चटका असला,तरीही दुपार हवीहवीशी वाटते!नाकोशीही वाटते!अशा वळणावर दुपार असते!स्वतःचं हसते!स्वतःचीचं नसते!दुपार चंचल असते!पाखरू अन वढाय असते!करारी सुद्धा असते!बंधूंनो ती दुपार असते!🌷

पश्चिमेकडे झुकलेला सूर्य... संध्यासमयी थकलेला असतो! मावळतीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो!तेज ओसरलेलं असतं!संध्याछाया मावळतीच्या दिशेला अंधुकशी झुकलेली असते!संध्याकाळ अबोल असते!अनामिक हसते!सूर्य विसावलेला असतो!संध्याकाळ देखील विसावलेली असते!दिवे लावणीची वेळ असते!अंधाराची चाहूल असते!संध्याकाळ दिव्याची ज्योत चाचपडतं असते!तिमिराच्या कुशीत विसावण्यासाठी आतुर असते!थोडी घायाळ देखील असते!दृष्टी अंधुक झाल्यागत असते!थकली-भागलेली असते!काहीही नकोसे वाटतं असते!ती.. ती संध्याकाळ असते!तिच्या कुशीत तिचं असतें!तरीही संध्याकाळ उभारी देत असते!विझण्यापूर्वी  तेजाळत असते!अंधाराचं स्वागतास उभी असते!पण संध्याकाळ मनाला भुरळ पाडीत नसते!थोडी उदास भासते!मलूल दिसते!तिला कसलीही ओढ नसते!उत्साह नसतो!...."मी उद्या पुन्हा भेटेन" म्हणतं आश्वासन देत थकलेला सूर्य डोंगरा आड निघून जात असतो!पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन सूर्य...अस्ताचा पडदा पाडून निघून जातो!अंधार करुण असतो!असह्य असतो !संध्याकाळ तिमिरात विलीन होते!संध्याकाळ अस्तित्वहीन होते!संध्याकाळ आधाराची काठी शोधत असते!!🌹

बंधू-भगिनींनो!
सकाळ,दुपार आणि संध्याकाळ  तीनही प्रहर मानवी जीवनात महत्वाची भूमिका पार पाडीत असतात!आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून काळ पुढे सरकत रहातो!काळासोबत माणूस ही पुढे सरकत असतो!मार्गक्रमण करीत असतो!...वयाचे ओझे घेऊन पुढे  जात असतो!वयासोबत माणूस पळत असतो!"मी"पनाचा डांगोरा पिटीत!अहंकाराचा ढोल बडवीत असतो!अपेक्षांचं अवजड ओझं उरावर घेत!दिवस-रात्र धापा टाकीत माणूस जीवनाच्या वाटेवर पळत सुटतो!
शेवटचा जीवन थांबा येईपर्यंत "मी"ला घेवून पळत सुटतो!कवटाळून धरतो अन निघून जातो!🌹

माणूस पहिले दोन प्रहर तारुण्य आणि सांसारीक व्यापात गुरफटलेला असतो!देणी-घेणी,जबाबदाऱ्यांचं ओझे घेऊन पळत असतो!तरुणपणी पेरतं असतो!थोराड समयी देत-घेत पुढे सरकत असतो!उरावर अनेक व्यापांचे ओझे घेत प्रवास सुरूचं राहतो!अंगाचं चिपाड झालेलं असतं!क्वचित आजारपण मागे लागलेलं असतं!तुसडेपणा अन संपत्ती कमविल्याचा अहंकार मनात जन्माला आलेला असतो!!जबाबदारीतून थोडा तरी मुक्त होतो!संवादाचं वर्तुळ लहान होत जातं!नाती वजा होत राहतात!कधी अहंकाराने मनाला वेढलेलं असतं!तुसडेपनां अंगात शिरलेला असतो!भिनलेला असतो!मुरलेला असतो!शून्यातून  संपत्ती कमविल्याचा ढोल बडवीत असतो!मग पुढे हातपाय थकल्यावर वाजणारा ढोल फुटतो सुद्धा!जिव्हाळ्याच भावनिक नातं तुटत जातं!सहवास नकोसा वाटतो!कधी एकट्याने तर कधी पत्नीच्या आधाराने म्हातारपणचं उत्तरायण सुरू होतं!🌹

बंधू भगिनींनो!
आपल्या वागण्याने उतार वयात..मुलं,सुनबाई!मनाने!तनाने दूर निघून जातात!म्हातारपणाची काठी दूर गेल्यावर याचक होतो!जीवन संध्याकाळी आधार शोधित असतो!हतबल होतो!संतती असते!संपत्ती असते!तरी ही मनाला स्वास्थ्य लाभत नाही!हात-पाय चालतं नाहीत!मरण येत नाही म्हणून जगणं असतं!जीवनाची संध्याकाळ खूप कठीण असते!ज्यांच्यासाठी केले तेचं दुरावलेले असतात!जवळ नसतात!बगीच्यातली फुलं दिसत नाहीत!नातवंड दिसत नाहीत!एकांतवास महाकठीण असतो!नकोसा असतो!अहंकाराचं जगणं ही कठीण होतं जातं!मावळतीच्या अशा कठीण समयी मन जाणणारे कोणीतरी जवळ असावे अशी माफक अपेक्षा असते आई-वडिलांची!💐💐

🌹म्हातारपण सुंदर असावं!लहान बालकांगत असावं!हासरं असावं!जेष्ठांगत असावं!दुसऱ्यांचे मार्गदर्शक असावं!कबाब में हड्डी नसावं!प्रेमाचा सागर असावं!मुलांनां समजून घेणार असावं!मुलांनी समजून घेणारं असावं!दुरून डोंगर साजरे असावं!आयुष्याची संध्याकाळ मोक्ष प्राप्तीकडे नेणारी असावी!आयुष्याची संध्याकाळ डोळ्यातील आसवं पुसणारी असावी!घरातलें सर्वचं डोळ्यासमोर असावे!ईश्वर चिंतनात लीन होत जाणारे असावे!🌹

बंधू-भगिनींनो!
प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा तिसरा प्रहर आनंदी जावा!निरोप गोड व्हावा!वृद्धापकाळ गुलाबासारखा फुलतं-फुलतं निघून जावा !झाले गेले गंगेत मिळाले म्हणून क्षमा करणारे असावे!जेष्ठांच्या मावळतीच्या प्रहरी सुंदर रंग भरण्यासाठी "मावळतीचे रंग"या साहित्यकृतीतून लेखक आणि प्रबोधनकार मा मोहनदास भामरे सर अर्थात बापूसाहेब एम के भामरे सरांनी जेष्ठांच्या आणि पाल्यांच्या जीवनात!मनात आनंदाची छोटी-मोठी सुंदर झाडं लावीत आहेत!
जगवू पहात आहेत!समन्वयाचे सुंदर फुलं फुलवित आहेत!घरादारात,अनेक कुटुंबात औषधी फुलांचा बगीचा फुलवित आहेत!कुटुंबातील नातेसंबंध जोडण्याचे, घट्ट करण्याचं महान कार्य करीत आहेत!वृद्धांच्या आयुष्यात आनंद फुलं फुलवित आहेत!सुखाची झाडं लावण्याचं महान कार्य करीत आहेत!🌹

घराघरातील नाते संबंध घट्ट बांधणारे भामरे सर!मावळतीच्या सुंदर रंगातून कुटुंबातील सदस्यांच्या हाती एकोप्याची अमृत कुपी प्रदान करीत आहेत!आनंद वाटीत फिरत आहेत!अंधकारात अडकलेल्यांना ज्ञानदान करीत आहेत!मावळतीचे रंग भरीत आहेत!एकलव्यागत लढत आहेत!शिकत आहेत!शिकवीत आहेत!खडकाळ माळरानावरील वेलीगत पुढे सरकत आहेत!🌹

जीवन एक धर्मशाळा आहे!मनुष्य प्रवास करत असतो!रात्र झाली की कुठेतरी धर्मशाळेत थांबायचं असतं!सकाळ झाल्यावर पुढे चालायचं असतं!बंधूंनो..आपला प्रवास सुरूचं आहे!नात्यांचा घट्ट बंध बांधून संवादी परीघात सहवास टवटवीत करायचा असतो!प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश यायचा असतो!फक्त कौटुंबिक नात्यात हिरवळ फुलवायची असते!दिवसभर पोटासाठी प्रवास आहे!मुक्कामाला धर्मशाळा आहे!कधीतरी कायमचा परत न येण्याच्या बोलीवर निघून जाणार आहे!...मागे जीवन धर्मशाळेत बरे वाईट नाव रहाणार आहे!अनेक कुटुंबात मावळतीचे रंग कुंचल्यातून भामरे सर भरीत आहेत!नाते संबंधांवर योग्य बोट ठेवीत पुढे चालले आहेत!स्वतःचे अश्रू लपवित!इतरांच्या घरातील अश्रू पुसीत पुढे चालले आहेत!💐💐

 अलीकडे घराघरात जेष्ठांचा उपदेश!सल्ला पचनी पडत नाही!नातवंडं-सुनांना आजोबा आजी,सासू-सासरे नको असतात!पण मुलांच्या जन्मापासून सतत पाठीशी असणाऱ्या!संस्कार करणाऱ्या आई-वडिलांना मुलं विसरतातचं कसे?आई-वडिलांची शिडी करून मुलं मोठी होतात!त्यांच्या करीयरमध्ये सतत पाठिंबा देणारे पालक उतार वयात मुलांमध्ये आधार शोधित असतात!आजारपणातं गरजा वाढतात!जीवनाच्या संध्याकाळी आधाराची काठी शोधित असतात!🌹

बंधू-भगिनींनो!
आई-वडील तीन पिढ्यांचा सांधा असतात!मन जोडणारे पूल असतात!घट्ट भक्कम आधार असतात!तीन ही पिढ्यातील संवादाचे केंद्र असतात!प्रेमाचा धागा असतात!तो तुटू नये म्हणून सतत काळजी घेणे आवश्यक असते!म्हणूनच काही विस्कटलेल्या नात्यांची घडी घालण्याचं महान कार्य सिध्दहस्त लेखक आणि समाजसेवक भामरे सर करीत आहेत!कौटुंबिक धागा विनीत आहेत!कधीकधी अपमान ही सहन करीत आहेत!प्रबोधनातून कुटुंबांतील माणसं जोडीत आहेत!अनेक कुटुंबात आनंदाचा शिडकावा करीत आहेत!🌹

'मावळतीचे रंगातून'अनुभवांचें वास्तव दर्शन होतं आहे!कौटुंबिक कलह टाळण्यासाठी वाहिलेले   बासष्ठ लेखांचे सुगंधी पुष्प आहेत!नातेसंबंधांनां जोडणारा पूल आहे!कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण,पोषक वातावरण साठी जेष्ठांच्या मनोअवस्थेचं औषध आहे! जगणं सुंदर,सुखकर,आनंदी आणि ओलाव्यातून पुढे जावे!मुलांनी आईवडिलांना सांभाळावे!आई-वडिलांनी अलिप्त राहून मुलांना मार्गदर्शन करावे!झेपेल इतपतच सल्ला द्यावा!अपेक्षांचं ओझं एकमेकांवर लादू नये!...असे भिन्न रंगी संवादी लेखन मावळतीचे रंगातून बापूसाहेबांनी मांडले आहे!
सुंदर जीवनाचा आनंद मनसोक्तपणे घेता यावा!सूर्य हळूहळू न कळता मावळून जावा!जीवन तृप्तीने अन समाधानाने पूर्ण व्हावे!हळूचकण वयोमानानुसार एक्झिट व्हावे असेंच जगणं व्हावे!'मावळतीचे रंग' सुस्पष्ट आरसा आहे नाते संबंधांचा!🌹🌷
..संक्रांती निमित्ताने हेचं हितगुज आपल्याशी!💐
        *************
........नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१४जानेवारी२०२१
(संक्रांत)🍲🍛🌷🌹🔔🔔🔱🔱

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)