बालपणीच्या कुशीत
#पुष्प_१८वे..
🌹बालपणीच्या कुशीत🌹
****************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
बालपण अतिशय निरागस असतं!कोमल असतं!उगवत्या सुर्यासम असतं!खळखळ वाहणाऱ्या नदीतल्या स्वच्छ पाण्यागत असतं!ते कसं बघा🌷
"जेंव्हा जेंव्हा लहान होतो
पतंग होऊनि आकाशी जातो!बालपण खांद्यावर घेऊनि
नक्षत्रांवर हुंदडुनि येतो!
रात्र अंधारी एकटाचं मी अमावसेच्या उदरात जातो!लपाछपीच्या खेळांमध्ये
हरवून स्वतःलहान होतो..🌷!''
बालपण !....औत्सुक्याने टंचं भरलेलं असतं!या दुनियेची ओळख करून घेत असतं!अधाशीपणे आपण डोळ्याला दिसेल ते घेत असतो!ग्रहण करीत असतो!निरागसतेचा भाव अंतरी उतरलेला असतो!स्वतःसाठी शाश्वत सत्य डोळ्याला दिसेल तेच असतं!मनात किल्मिश नसतो!गोंधळ नसतो!वाईट विचारांचा तर जन्म ही झालेला नसतो!बालपण नव्या उगवत्या सुर्यगत असतं!ताजे असतं!कोमल असतं!हासरं असतं!खेळकर असतं!नटखट असतं!बुजरं असतं!तगडही असतं🌷🌺
बंधू-भगिनींनो!
बालपण तुमचं आणि माझं जवळपास सारखचं असावं!...काहींचं बालपण गरीबीमुळे,दारिद्र्य स्थितीमुळे कोमेजून जात असतं! परीस्थिती तोंड द्यायला शिकवीत असते!उभे रहायला शिकवीत असते!जगणं शिकवीत असते!
बंधू-भगिनींनो!
माझं बालपण धुळे जिल्ह्यातील भामेर किल्ल्यापासून जवळपास पंधरा किलोमीटरवर असलेल्या "म्हसाळे" या छोट्याशा खेड्यात गेलं आहे!वनश्रीने नटलेल्या खेड्यात गेलं!मामांच गावं म्हसाळे निसर्गाने दान दिलेलं खेडेगाव!झाडं भरपूर!... गावातील घराच्या अंगणासमोर हमखास लिंबाची हिरवीगार झाडं दिसतात!गावाच्या आजूबाजूला लहान-मोठी दोन धरण आहेत!
आज जवळपास सेहेचाळीस वर्ष झालीत गावं सोडून!पण ज्या मातीत मी जन्मलो ती माती सतत बोलावीत असते!ओढीत असते लोहचुंबक होवून मला आकर्षित करीत असते!...मी ही ओढला जात असतो!मायेच्या मायेत ओढला जात असतो!🌹
म्हसाळ्यात सर्वचं आपले होते!आपले आहेत!आप्त,स्नेहीं,मित्र परीवार आहेत!तेव्हा आठ-दहा वर्षांचा होतो!आज अठ्ठावन-साठ च्या जवळपास आहे!तेथे गेल्यावर सर्वांची ख्याली-खुशालीतं सहभागी होतो!कधी एकटाचं ज्ञानमंदिरात!माझ्या शाळेत जाऊन मैदानावर माझं डोकं टेकवितो!शाळेचं ऋण अंतरी घेवून पुढे सरकत असतो!कृतज्ञता व्यक्त करीत असतो!🌹
समोरच रस्त्याच्या कडेने महादेव मंदिर आहे!एकटाच तेथील पायरीवर जाऊन बसतो!बालपणीची ओळख शोधित बसतो!खाणाखुणा बोलावीत असतात!म्हसाळ्याच्या त्या पवित्र ज्ञान अन जन्म भूमीवर मनसोक्तपणे स्वतःला झोकून देत असतो!तेथील लहान-मोठ्या नैसर्गिक टेकड्यांवरील झाडांच्या अंगा खांद्यांवर बालपणी मी मनसोक्तपणे हिंडलो-फिरलो होतो!हृदयातघेत होतो!🌹
अजूनही ती पवित्र माती मायेने सतत बोलावीत असते!अजूनही ती माती अंगाला चिकटल्याशिवाय,धूळ मस्तकी लावल्याशिवाय समाधानच होत नाही!मी स्वतःला बालपणात ढकलून मोकळा होत असतो!माझा जन्म आजोळी म्हसाळ्यातला!पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण म्हसाळ्यातच झालें लं!माझ्या बाल मनावर संस्कार करणारं,मनाला घडवणारं चिमुकल सातशे-आठशे घराचं मामाच गावं म्हणजे साक्री तालुक्यातील म्हसाळे!🌹
एसटीचा थांबा म्हटलं की धुळे-डोमकानी रस्त्याच्या कडेला लावलेली 'म्हसाळे' नावाची पाटी लक्ष वेधून घेत असे!सर्व प्रवाशांची निमूटपणे वाट बघत ऊन पावसाची पर्वा न करता एका लोखंडी खांबावर लटकलेली ती पाटी सर्व ऋतू सहन करीत येणाऱ्या जाणाऱ्याची ओळख खूण होती!सर्वांच स्वागत करीत असे!दिवसातून एखादी-दुसरी एसटी रस्त्यावरची धूळ उडवत,इंजिनमधून धूर काढीत,स्टँडवर थांबायची!एखादा दुसरा प्रवाशी एसटीतून उतरायचा!एखादा दुसरा ओळखीचा बसमध्ये जाऊन बसायचा!धूर काढीत एसटी मार्गस्थ व्हायची!लालभडक एसटी पाहिल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडत नसे!त्याकाळी कधीही मी एसटीत बसलो नव्हतो!दुरून कुठून येते?कुठे जाते?समजतही नव्हते!पण एसटी आल्यावर मन हुरळून जात असे!खूप आनंद व्हायचा!समोरचं रस्त्याच्या कडेला जिल्हा परिषदेची शाळा होती!
तीच माझी शाळा होती अन अजूनही ती आपलं अस्तित्व टिकवून उभी आहे!मी एकोणसाठ वर्षांचाआहे!..ती झेड पी ची शाळा किती वयाची असेल बरं? तेथे गेल्यावर मन हुरळून जात असतं!
वास्तू डागडुजी करून उत्तम स्थितीत उभी आहे, तशीच आहे!चुना-दगडाच्या भिंती आहेत! अनेक विध्यार्थी,अनेक गुरूजी आले असतील!कित्येक गेलेत!
प्रत्येकजन आपल्या पाऊलखुणा तिथे ठेऊन गेलें असतील!🌷
बालपण पक्क्या अनुभवांची शिदोरी असते!बालपण मागे ठेऊन,बालपणीच्या आठवणी घेऊन अनेकजन कुठे ना कुठे असतील ही!शिदोरीतल्या आठवणी आयुष्यभर सोबत घेऊन आपण मार्गक्रमण करीत असतो🌹🌷
"माझेच मोजिले मी तेथे ठसे पावलांचे
काटेच रुतलेलें अनंत नाजूक भावनांचे!
ताटवे रानावनातले फुललेत सुगंधी फुलांचे!"🌹
म्हसाळ्यात जिथं जिथं हिंडलो,गावाच्या आजू-बाजुनी फिरलो!मळ्यात,शेतात, जंगलात,धरण परीसर!सर्व रस्ते हिंडलो,लामकानी रोड,नागपूर रोड,वरधाने रोड,विहीरगाव फाटा रोड,सोसायटी रोडने त्याकाळी हिंडलो!काळा प्रमाणे सर्वच बदलले!माणसं बदलली!जवळपास सर्वच मळ्यामध्ये फिरलो असेल!गावाच्या गल्लीबोळातून हिंडलो! बालपणीच्या मित्रांबरोबर 🌹हिंडलो!गावातल्या मंदिरात गेलो!
आपल्या जन्माची खूण गावं जपून ठेवीत असतं!खरं म्हणजे बालपणीच तेथील लोकसंस्कृतीच उत्तम दर्शन झालेले आहे!जंगलातल्या कंसार झाडांचा डिंक काढला!आमोद बारीकडे कित्येक वेळा गेलो होतो!🌷🌹
म्हसाळे गावाच्या आसपासच्या नाल्यात पाणी तुडवत,पोहत हिंडलो होतो!जम्हाय नाला,चिंचेचा नाला, हागऱ्या लवण,बाबुदादा लवण,डु-नाला वगैरे परिसर हिंडलो!डोळ्याचं मनाचं पारण फिटे पर्यत हिंडलो!गाव विहिरीवरुन वयाच्या आकराव्या वर्षांपर्यंत छोट्याशा कावडीने पाणी आनायचो! म्हणूनच माझ्या निरागसतेनं, भाबड्या अभिमानान सांगावसं वाटत तेथील प्रत्येक ठिकाणावर! जागेवर माझा अधिकार आहे! एवढ एकजीव तेथील मातीने केलं होतं!माती मस्तकी लावावीशी वाटते!कधी आठवणींनी ऊर भरून येतो!🌺🌷🌹
"दूर दूर जाऊनि पोटासाठीच रमलो मी!
पक्षांगत पंख उडवीत कधी तरी दमलो मी!
कधी तरी मित्र भेटतीआठवणीत रमलो मी!"🌹
अंतःकरणात कोरलेल्या बालपणीच्या आठवणी सहसा आपल्या मनपटलावरून पुसल्या जात नसतात!ती शिदोरी संपूर्ण आयुष्याची असते!आपल्याला जन्मस्थळाच्या आठवणी नेहमीच जन्मस्थळी घेऊन जात असतात! कदाचित त्या birth place strong magnetic atractionअसतील ही,ज्या जन्मस्थळी आपल्याला ओढत असतील🌹🌺
"हसुनि मज त्या साथ देतात
कंठातले शब्द ध्वनी होतात! माझ्याच मनाला आठवणी ओढूनी नेतात!"🌹
संपूर्ण गावाची भार वाहक!हवीहवीशी वाटणारी! बसथांब्याची पाटी! माणस एकत्र येण्याचं महत्वाचं ठिकाण बनवलं होत!गावाची मुख्य गल्ली धुळे-डोमकानी रोडच्या दक्षिणेला होती!इंग्रजी टी आकार घेऊन सरळ डोंगर बापूजींच्या मळ्याकडे,नागपूर गावाकडे जात होती!तेथील आडव्या-उभ्या गल्ल्या गावकी टिकवून होत्या!ताठ मानेने उभ्या होत्या!नगर रचनाकार ही मोहात पडावा इतक्या घट्ट वीणलेल्या होत्या!एकजिनसी धाग्यानी विणल्या होत्या!सुख-दुःख ,लग्न कार्य सर्व काही रक्ताच्या नात्यांइतकीच जवळची माणुसकी जपून होती!रक्ताचं नात गावाने जपलं होतं
"जोडीलें नाते नात्यानं!
दुःख भरडीले जात्यानं! जन्मोजन्मीचा घट्ट धागा
विणला होता जातींन!
लोकजागर एक दिलाचा
केला होता साथीन!
सुख-दुःख लग्न सोहळा
पेटवीत होते ज्योतीन!"🌹
अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असायची! 'भवाडा' म्हणजे रामायण महाभारतातील विविध जिवंत पात्रे करावें लागे!म्हसाळे त्या काळी रामायण महाभारताचा जिवंत अनुभव घेत हो!भजन किर्तनाने लोक जागृती आणि निखळ धार्मिकतेच समाधान घेत होते!बालपणी अनेक लग्न सोहळ्यात स्वतःला मिरवत होतो!तीन-चार दिवस लग्न सोहळा साजरा व्हायचा!हळदी पासून विवाह संपन्न होई पर्यंतचा कालावधी आनंद सोहळा असें!लाकडी जात्यातून पुरण दळल जायचं!लग्नात पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा!चुलबंद आमंत्रण असल्याने सर्वांचाच सहभाग असायचा!बालपण एका लेखात बसणारे नाही!चारशे ते पाचशे पाने जरूर होतील तर बंधुंनो!वर-वधू जवळपासच्या गावांतील असायची!दळणवळणाची मर्यादा म्हणून जवळपासच्या स्थळाला पसंती होती!आज संपूर्ण जग एक गावं झाले आहे.विवाह जमविणे सहज शक्य झाले आहे!जगासोबत आपण निघालो आहोत!सर्वांची सोय म्हणून की काय विविध विवाह संस्था,मंडळ विवाह सोहळा आयोजित करीत आहेत!आपण ही त्या प्रक्रियेचा एक मोठा भागीदार आहोत!जीवन पुढे सरकत राहील! गावांतील आठवणींच्या एक एक ज्योति लावत राहू!बालपणातून पुढे पुढे सरकत राहू!बालपणीच्या त्या समृद्धअनुभवांनी, इतिहासाच्या पानांनी पाया रचला! आपलयाला शहरात येथवर पोचण्याची संधी मिळाली!बालपण देगा देवा कधी विसर न व्हावा असे म्हणतआयुष्याच्या वळणावर भेटत राहू!बालपण मनात साठवीत राहू!आठवणी हृदयात जपत पुढे जात राहू!😊😊🙏🌷🌹
बंधू भगिनींनो!
पुन्हा भेटूया पुढील पुष्पांसोबत तोपर्यंत नमस्कार🌷🌷🙏
**********************
....#नानाभाऊ_माळी,
लेखक, कवी
#साहित्यसम्राट
हडपसर,पुणे४११०२८.
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२७डिसेंबर२०२०
Comments
Post a Comment