आई ममतेचा सागर

पुष्प-१४वे....

      🌹आई ममतेचा सागर🌹
        *************
              .....नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!

 भारत मातेचा!स्वातंत्र्य दिनाचा!मातेच्या रक्षणाचा!बहिणीच्या रक्षणाचा!स्त्री जातीच्या रक्षणाचा!मातेच्या सन्मानाचा हा प्राचीन महान संस्कृतीचा भारत देश आहे!भरत भूमीत जन्म घेणारी प्रत्येक जन्मदात्री माता-भगिनी महान संस्कृतीचे गंगा-यमुने सारखे निर्मळ पावित्र्य वाहून नेणाऱ्या वाहक आहेत!चारित्र्यवान माता आहेत!

 भारत मातेचं!भरत भूमीचं!भारतातील प्रत्येक माता भगिनींचं रक्षण करणे आपल्या प्रत्येक भारतीय सुपुत्राचं आद्य कर्तव्य आहे!भारत भूमी सुरक्षित असेल तर आम्ही सुरक्षित आहोत!माता भगिनी सुरक्षित असतील समाज तर सुरक्षित असतो!प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासूनचं करावी लागते!कदाचित आपल्या कुटुंबापासूनचं करायची असते!झाली ही पाहिजे!त्यासाठी त्यागही  करावा लागतो!

बंधू-भगिनींनो!
 जन्म देती आईची सेवा करणे प्रत्येक मुलाचं प्रथम दायित्व असतं!कर्तव्य असतं!आपल्याला जन्म देऊन स्वतः वेदना सहन करीत असते!जग दाखवीत असते!माता देवाचं संपूर्ण रूप असते!ममतेचा सागर असते!कनवाळू त्यागमूर्ती असते!विश्वाची जननी असते!आई सार्थक असते!आई जगाला न समजलेला अर्थ असते म्हणून महान असते!

बंधू-भगिनींनो!
 आपल्या भावनेच्या शिंपल्यातून!कल्पनेतल्या शंखातून एक एक स्वर मोती बाहेर पडत असतात!अनंत मोती पेहरणाऱ्या लेखणीत शब्द भरले जात असतात!विशाल ममतेचा वटवृक्ष साकारला जात असतो!त्या ममतेच्या वटवृक्षातं आईचं निवास असतं!कोमलतेचा सहवास असतो!काळजाचं आभाळ असतं!मायेचा हळुवार स्पर्श असतो!

बंधू-भगिनींनो!
 विशाल अन अज्ञात रुपी मायेच्या आभाळाला कोणी माय म्हणत असत!कोणी 'माडी' म्हणत असतो!कोणी 
'माँ'  म्हणत असतो!कोणी आई म्हणत असतो!कोणी mother म्हणत असतो!हळुवार करुणेची,उबदार कांबळ म्हणत असतो!माय हिवाळ्यातील उबदार कांबळ असते!नव्हे जन्माची पवित्र चादर असते!माझ्या 'माय' बद्दल!माझ्या 'माडी' बद्दल!माझ्या आई बद्दल!माझ्या शांत-अनंत सागरा बद्दल मी अस म्हणेन.....
 
"उपकार तुझे गं शतजन्मीचे झाकुनी पदरातुनी!
नऊ मासाच्या कळा सोशिल्या टाहो फुटला उदरातूनि!

मातृत्व कसे हे फुलुनी गेलें झोपलो उबदार कुशीत कधी!
नयन माझे दिपूनी गेलें आलो प्रकाशाधी!"

जन्मापासून!बालपणापासूनचं आपण आईच्या कुशीत स्वतःला सुरक्षित समजत असतो!वयाने कितीही वाढलो!मोठा झालो!नातवंड समोर खेळतायेत-बागडताहेत!तरीही का कुणास ठाऊक आईच्या मांडीवर,तिच्या कुशीत डोकं ठेऊन पडलो की मायेचा-ममतेचा तो सुरकूतंलेला  कोमल हात लाख-लाख सुखा पेक्षा ही अमृत समाधान वाटतं असतो! 

बंधू-भगिनींनो!
माझ्या आईचं वय जवळपास ९४-९५ वर्षाचं असेल!अजून ही  ती अतिशय काटक आहे!चेहरा अन अंगकाठी सुरकूतलेली आहे!हाता पायाची अंगावर चिकटलेली त्वचा सोनपापडी सारखी दिसते आहे!पण सुरकूतलेल्या हाताच्या ऊबेत ममतेची उब आहे!हाताच्या तळव्यांमध्ये अमोघ ममतेचं अमृत भरलेलं असावं!ती सतत आम्हाला ऊर्जा देत असते!संकटी धीर देत असते!आधार देत असते
 माझ्या 'माय' बद्दल सांगावस वाटतं.....

" बोट धरूनि दुडू दुडू चाले कधी सुटेना माझी मुठी!
मातृत्वाचे दान देऊनि आई झाली तुझी वळकुटी!

चम चम तारे लेखणीत भरावे आकाशी लिहावी कहाणी!
आई चरण तुझे रोज धुवावे माझ्या अश्रू नयनातुनी !'' 

घरा घरातील अनेक माता आपल्या मुलांसाठी आपल्या जवळचं सर्व काही देत असतात!सतत दान करीत असते!स्वतः झिजत असते!श्रीमंतीचं काळीज वाटत असते!देहदान करीत असते!स्वतःचं बलिदानासाठी ही तयार असते ती विशाल हृदयी माताचं असते!मला जर पुन्हा पुन्हा जन्म मिळाला तर देवा  मागणे आहे,'मला आई मात्र माझी मायच दे 'हिच याचना करेन!तिच्यासाठी म्हणावसं वाटत .......

"पावसातील छत्री माझी उन्हातील सावली तू!
उबदार पांघरून झालीस कधी स्वतः गोठलीस तू!

तुझ्या जवळी येतो जेव्हा आभाळ दिसतेस मजला!
काय लिहावे तुजवरी आई आभाळही संपला!''

बंधू-भगिनींनो!
  घराघरातील एकत्र,एकसंघ कुटुंब पद्धत हळू हळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे!पण घरात सर्वात जेष्ठ,वयस्कर व्यक्तीमुळे घराचं घरपण टिकून रहातं!आजही टिकून आहे!आई-वडील जन्मदाते असतात!लहानपणी ज्यांनी आपली बायतोळे धुतली!अस्वच्छ कपडे धुतले!अंघोळ घालूनं निर्मळ देह समोर ठेवला!स्वतः आई मात्र त्या राबण्यात समाधान मानीत राहीली!स्वतः झिजत राहिली!त्यांतच आनंद मानीत राहिली!आपल्याला संस्कार अमृत पाजत राहिली!आपल्याकडे  म्हातारपणाची काठी म्हणून पाहतं राहिली!

आई-वडील कितीही म्हातारे झाले!थकले!तरी आपल्या कुटुंबाचे अविभाज्य अंग असतात!याचं वयात त्यांना खऱ्या आधाराची!आपुलकीची!प्रेमाची गरज असतें!आपल्याला दिलेल्या जन्माचे महान उपकार असतात!ते आपल्या एकजीव कुटुंबाचा प्रमुख भाग असले पाहिजेतं!

 आपण जे पेरून ठेऊ तेच आपल्या मुलांच्या रुपात उगवलेले असतं!संत कबीरांचा दोहा आहे..

"बीज बोया बबूल का आम कहा से आये!'आंब्याचं झाड लावलं तर गोड झाड अमृताचाच गोडवा देतं असतं!बाबळीच लावलं तर धारदार काटे येत असतात!चांगले संस्कार जीवन घडवीत असतातं!

......बंधू -भगिनींनो! 
बहीण ही भावांची प्रेमळ सावली असते!मायेचं दुसरं रूप बहीण असते!भावावर आई नंतर जीव लावणारी हक्काची अधिकारी असते!लहानपणी आपल्याशी भांडणारी!एकमेकांवर जीव लावणारी बहिण राखी रुपी पवित्र धागा भावांच्या मनगटी बांधतं असतें!कधी आनंदून जाते तर कधी माहेरचा गहिवर दाटून येत असतो!डोळे पुसणारी हक्काची व्यक्ती असते!प्रसंगी आधार देणारी आधार वड होते!लग्न झाल्यावर दूर गेलेली बहीण माहेरी फक्त भावाच्या सुख दुःख विचारणारी दुसरी मायचं असते!जन्मोजन्मीच हे पवित्र नातं टिकून आहे..... 

आई-बहीण हे मायेचं!भावभावनांचं आंतरिक हृदयाचं नातं आपण टिकवून ठेवू!आपण पुढे सरकत राहू!दिवस जाताहेत! येताहेत!या संसार रुपी रहाट गाडग्यात आई वडिलांनी चटका आधी सहन केलेला असेल!बंधू भगिनींनो आजचा विषय असाच पुढे नेतं राहू!आईरुपी सागरास प्रणाम करीत राहू!आपल्या मनातल्या पावित्र्याला  पुढच्या पिढी पर्यंत नेतं राहू!आई वडीलानी  जो वारसा चालवला  जे सहन केलं आपण तोच वारसा पुढें न्यायचा असा प्रण करूयात! संसार सार करण्यातल सुख-दुःख आपल्या जन्मापासून सुरु होतो!आई जन्मदात्री असते!पुढे आपणही त्याच मार्गावरचे प्रवासी बनणार आहोत!संसारवेदी वरून संसार वेलीवरील सुंदर फुलं माळत असतांना बहिणाबाईची कविता आठवते.....
''आधी हाताला चटके मग मिळे भाकर!' संसारातील सत्यापर्यंत पोहचण्यासाठी जीवनात चटके सहन करावे लागतात!स्वतः सहन केल्याशिवाय इतरांना आनंद देऊ शकत नाही!म्हणतात की सुख जवा एवढे दुःख डोंगरा एवढे! बंधू-भगिनींनो!चढ उतारांचा डोंगर पार करून आपण येथवर पोहचलो आहोत!आईच्या कुशीतून भरभक्कम उभे आहोत!

कोणी कवी म्हणून गेला आहे "धागे धागे मनातले ते,आडवे उभे विनित गेलो!
आकारली मग विशाल चादर पाहुनि अचंबित झालों!

आकाशाची ही अनंत चादर, विणूनि धागा संपुनी जातो!
मग तुटुनी जातो कधी धागा मनातील,तुकडे तुकडे अंगावर घेतो!

तुटून जूडती धागे धागे, तडजोडीने घर पुढेच नेतो!
संसार सुख तडजोडीने पुढे पुढेंच नेतो!

आईच्या महान जन्माची ही सारं कथा संसार रुपी कपडयाचे ठिगळ लावून दिवस सोन्याचा करायचा हेच संसार हित समजून पुढें चालतं राहू! कधी कधी लक्षात येत...
'राहुनी गेले मागे काही, आता वळुनी नको पाहू!
सूर तुझे माझे जोडुनी, आपुलें नवीन गीत गाऊ!

जुन्या क्षणांची रात्र नकोशी, निघुनि गेली दूर!
पहाट घेऊन आली संगती, नव्या दमाचा स्वर!' 

मागचं विसरून,नव्याच्या साथीने पुन्हा पुढें जात रहाणे हाच आनंद असतो

'झाले गेलें विसरुनी आता, नव्या वाटेने जाऊ!
थोडे तुझे थोडे माझे, आता नवीन गीत गाऊ!'

सुखी संसारासाठी संकटात खंबीरपणे तोंड देणाऱ्या आईसाठी!तिच्या दिर्घ आयुष्यासाठी मागणे मागतो! सुख समाधाना जवळ जाणे हेच हित असत!आई हि ईश्वराचं रूप असते!

डोक्यावरती सूर्य आमुच्या,कठीण परीक्षा काळ!
चटका घेत पुढे चालती,जोडीतें नात्या गोत्यांशी नाळ!'' 

पुन्हा सांगावस वाटतंय की मागे
 राहिलेल्याना ही सोबत घेऊन जावं,' राहुनी गेलें माघारी, तयासी सोबत घेऊनि जाऊ!आशीर्वाद आईचे एक झालें आता सुंदर जग पाहू!'

.......बंधू-भगिनींनो!सूंदर घराची कल्पना करूयात!जेथे जेष्ठांची सेवा होते!त्यांचा आदर,मान मरातब राखला जातो!आपल्याकडून त्यांची सेवा होत आहे अशी संकल्पना करूयात!भावपूर्ण नाते जोडुयात!भावबंधनात एकत्र येऊ यात!आतून उमाळा जिथे ठायी ठायी भरला असेल!तिथंच घराचं घरपण टिकून राहत!केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरांमध्ये!आपुलकीच्या नात्यामधुनि,स्नेह जपावा घरामध्ये!आभाळा एवढी आई असावी घरांमध्ये! स्वार्थ प्रत्येकाच्या मनात ठायी ठायी भरलेला असतो!कलहाणे घराचे वासे फिरतीलअसे वागू नये!आई ज्ञान देते!जन्म देते!संस्कार देते!आत्मीयता अन  घरपण देत असते आई!

 बंधू-भगिनींनो! 
जीवन सुंदर आहे,त्यात अमृत टाकुनी पाहू!संजीवनी जगास साऱ्या वाटीत आता जाऊ! जन्मोजन्मी आईची पूजा करीत राहू!चंद्र सूर्य उगवतील रोज त्यात आईला पाहू!आईरुपी दैवताची पूजा करू!सेवा करू!आशीर्वाद घेऊ!एवढेचं बोलणे आहे आज!
        
.......पुन्हा भेटूया पुढील पुष्पासोबत!तोपर्यंत नमस्कार🙏
                    🌹*******🌹
       ........नानाभाऊ माळी,         
              हडपसर,पुणे-२८
        मो.नं ७५८८२२९५४६ 
                ९९२३०७६५००
       दिनांक-२९नोव्हेंबर२०२०

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)