अमृत शब्दस्पर्श

पुष्प-१५वे...
🌹अमृत शब्दस्पर्श🌹
      ************
      ......नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
'पाषाण शिल्पात जीव ओतला कुणीतरी
स्पर्श तयाचा मज घेऊ द्या आता तरी!

विरोधाला विरोध आम्ही केला होता जरी
पुसून टाकिले अस्तित्व मज सांगू द्या तरी!

किनारा सोडून दूर जाऊ नका आता तरी
भक्तीने विशाल वाळवंट भरीले चंद्रभागेतिरी!

वाद विवादात वाहूनी गेलें कितीतरी🌹
थोडेसे अमृतशब्द वाहू द्या आता तरी!'🌹
........तसेंच पुन्हा म्हणावेसे वाटतं......

 'ठाम उभे येथे आम्ही, 
कित्येक वर्ष गेले माघारी
नजरेतल्या कोपऱ्यात 
भरुनी ठेविल्या घागरी!

ओसंडूनि वाहती दुःख 
घेऊनि जाण्या माघारी
अमृत कलशातुनी शब्द नेऊनि
.........मी येईन घरोघरी!'🌹

बंधू भगिनींनो!
 मनातल्या अंधार कोठडीत वादळे येत असतात!जात असतात!त्यातून ही आपण खंबीरपणे उभं रहात असतो!तोंड देत आपला मार्ग सुकर करीत असतो!वेदना आणि यातना हा त्याचा पाया असतो!आनंद कळस असतो त्या विषयाचा!प्रत्येक क्षणी आपण आनंद मिळविण्यासाठी धडपडत असतो!🌹

२५जून१९९९रोजी माझा'दोन हजार साल'हा पहिला काव्य संग्रह अमरावती येथे प्रकाशित झाला होता!त्याचसोबत अनेक कवी लेखकांचे काव्यसंग्रह आणि कथासंग्रह देखील प्रकाशित झाले होते!सामाजिक,राजकीय, आर्थिक,अशा अनेक विषयांना त्यातील अनेक कवितांनी स्पर्श केला होता!सुख-दुःखाच्याही पलीकडचे विषय त्या ग्रंथात वाचण्याची संधी त्यावेळेस मिळाली होती!अर्थाने नाही तरी साहित्य श्रीमंतीचं दर्शन घडलं होत!अनेक ज्ञानियांच्या संगतीत मी ही मनाने श्रीमंत झालो होतो!

अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अमरावती नगरी ज्ञानामृत वाटीत होती!मी ही तेथील ज्ञानकण वेचित होतो!नुकतेच प्रकाशित झालेले ग्रंथ अधाशीपणे वाचीत होतो!..🌹

बंधू-भगिनींनो!
 अनेक ग्रंथातील अमृतशब्द घेऊन मी ही तृप्त मनाने माघारी आलो होतो!अनेक महान कवी-लेखकांची कलाकृती अंतकरणातं रीचवीत होतो!तृप्तीने न्हाऊन निघालो होतो!प्रत्येक कवी,लेखकांच्या अंतरंगात अनंत वादळे उठत असतात!त्यांचं रूपांतर लेखणीद्वारा साहित्यकृतीत उतंरत असतं!
शब्दतृप्तीचा अमृतानुभव वेगळाच असतो!आल्हाददायक असतो!🌹

'शब्द शब्द पेहरीत जावे
शब्दकण ते वेचूनि घ्यावे!

 त्यातूनि अमृत वरती यावे उघड्या नभाला दान द्यावे!

अमृताचा खजिना घेऊनि
मोक्ष आपुले करुनि घ्यावे!🌹

 ..... विचारांचा कल्लोळ हजेरी लावून बंडखोरी करणारी वादळ मनात शांत होत असतात!कवितेतून ती वादळ जन्म घेत असतात!माझाही 'दोन हजार साल'हा कविता संग्रह माझ्या साहित्यिक रचनेतील पहिलंच अपत्य होतं!प्रकाशनाची जिज्ञासा!उत्सुकता आणि मनातील हुरहूर शिगेला पोहोचली होती!त्यावेळेस नवकवी म्हणून साहित्य विश्वात पदार्पण करीत होतो!

माझी साहित्य प्रांतातील उमेदवारी नवीन होती!मी अजूनही नवीनचं आहे! खूप काही शिकतो आहे!तेव्हा नवीनपण होतं!आज ही आहे!अंतरंगातली भूक, काळजातील उठणाऱ्या अनंत लाटांवर स्वार होऊन माझं कविता लेखन चालू होतं!बावन्न कवितांचा माझ्या दृष्टीने हा अनमोल ठेवा होता!कच्चा माल पक्का होणार होता!कवितासंग्रह छापील स्वरूपात दिसणार होता!मी आतुरतेने प्रकाशन समारंभाची आतुरतेने वाट पहात होतो! विद्वानांची उपस्थिती मनाला शक्ती देत होती !मनातील उठलेले अनंत वादळे कविता संग्रहात बंदिस्त केली होती!कैद केली होती!मी उसासा टाकत समाधानाने मोकळा झालो होतो! 

मनातली आंदोलने प्रत्येक व्यक्तीत बंदिस्त होत असतात! योग्य वेळ आल्यावर बाहेर पडतात असतात!कधी ती प्रबोधनकारी असतात तर कधी समाजात दुफळी ही माजवणारी असतात!म्हणून मनाला संस्काराच्या तप्त भट्टीत टाकल्याशिवाय प्रबोधनकारी रचना निरंतर चालू राहू शकत नाही!' दोन हजार साल 'या काव्य संग्रहाने मला तेव्हा नवी दृष्टी प्रदान केली होती!मनचक्षुतून पाहत होतो!

 १९९३ साली आलेल्या किलारी भूकंपाने शाश्वत जीवना विषयी विश्वास उडून गेला होता!संपूर्ण मानवी उपाययोजना तोकड्या पडल्या होत्या!हतबलता,निराशा अन जीवन मूल्य गळून पडली होती!त्याविषयी त्या हृदयद्रावक स्थितीच मनात प्रचंड घालमेल चालू होती!त्या विमनस्क अवस्थेत एक रचना लिहिली होती!कविता संग्रह होता 'दोन हजार साल'  

काव्यसंग्रहाच्या या कवितेतील शब्द हृदयाला पाझर फोडतात! कवितेचं शीर्षक होत
'नवा प्रांत!'🌹
 माझी नवीनचं साहित्यकृती होती!रचना होती!किल्लारी भूकंपाचं ही दुःख होतं! रचना अशी होती...

'पुत्र-कन्या माय बाप अन कांत 
मानवतेचा गाव साखर झोपेत शांत!

दुभंगली धरणी जाहला आकांत!
वावटळीत चादर उडाली दुमदुमला आसमंत!

भाद्रपदाची पौर्णिमा रुसली अश्रू ढाळीतो चंद्रकांत!
कुंभकर्ण सम चंद्र झोपला पहात राही दुर्दैवी अंत!🌹

चवताळली कुत्री अन डुकरे मांसाहारी त्यांचा पंथ!
पक्षाच्या डबड्या मधुनी चंदा मागतो धूर्त पंत!

गुंफलेली नाते तुटुनी गेली शोधूनि पाहे नवाचं प्रांत!
भटकत राहू जन्मोजन्मी मुक्ती मिळेल कसली खंत!' 🌹

 बंधुनो!.. निसर्ग कोपतो तेव्हा प्राणी जीवन उद्वस्थ होत असतं!संकटे कुठलंही असोत पुर,दुष्काळ अन भूकंपाने सर्व उध्वस्त होत असतं!माझ्या मनात तेव्हा भावनांचा प्रचंड कल्लोळ उफाळून आला होता!

१९९९ साली प्रस्तुत कवितेतून तेंव्हा मी माझ्या भावनांना वाट करून दिली होती!मनातल्या दबलेल्या भावनांना वाट करून दिली होती!आपल्या भावनांचा निचरा झाला पाहिजे बंधूंनो!अन्यथा विस्फोट होण्याची भीती असते! व्यासपीठ अनेक असू शकतात! सामाजिक संस्था,अनेक NGOs,घरात, कार्यालयात आदि सर्व ठिकाणी आपली भूमिका मांडत राहायला हवे!भूमिकेची गळचेपी झाली, योग्य प्रकारे न्याय मिळाला नाही तर भूमिकेची माती होण्याची भीती असते!मग मनातला विस्फोट भूकंपासारखा प्रचंड हानि करून निघून ही जात असतो!
  
बंधू-भगिनींनो! 
१९९९ साली १९९३सालच्या भूकंपाची सल होती!वेदना होत्या!यातना होती!वास्तवातले ते जगणं कवितेत मांडलं होत एवढंच!

 जगभरातील अश्रूंना वाट फुटेल तिकडे वाहू द्यावं!
काय काय सहाव अश्रूंच्या जातीनं!
निदान सागर तरी भरतील पुन्हा वाफेसाठी!वाफेतील ढगात दुःख भरलंय कुणी पाप्यान!
वीज कडकडून सरी कोसळतील तेव्हा गुलामांचा घाम!तुडुंब भरतील सागर लाल पाण्यानं!
ऋतुचक्र अश्रूंच जन्मोजन्मी मरणाचा हा खेळ वाहात राहणं सागराला मिळणं!
 गुलामांच्या जातीनं!अमृतशब्द असेच आपण वाटीत राहू!नवसंजीवनीची कुपी घेऊन पुढे जात राहू!अमृत शब्द वाटीत जाऊ!🌹
 
यशस्वीतेच्या वाटचालीची धडपड केलीच पाहिजे!यालाच जीवन असे म्हणतात!यालाच अमृतयोग म्हणतात!अमृताचे शब्द देत राहू!घेत राहू!वाटीत राहू!पुढे वाटचाल करीत राहू!
 पुन्हा भेटूया पुढील पुष्पासोबत !    
      🙏🌹***🌹🙏

.........नानाभाऊ माळी,
'साहित्यसम्राट,पुणे'
 हडपसर,पुणे ४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
  दिनांक-०६डिसेंबर२०२०

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)