हवेतला_फुगा.. #एक_अमृतमंथन

🌷 #पुष्प_०९वे..🌷

    🌹 *"#हवेतला_फुगा.. #एक_अमृतमंथन !"* 🌹

                          .......#नानाभाऊ_माळी
 
🙏बंधू-भगिनींनो! 

पावसाची रीमझीम थोडी थांबली होती म्हणून मी काल एका बगीच्यात जाऊन बसलो होतो!छोटी मोठी फुल झाडे दिसत होती!काही गंधयुक्त तर काही गंधहीन होती!मी अशा ठिकाणी बसलो होतो जिथं झाडाच्या फांद्या आणि फुलं माझ्या अंगाखांद्याला हवेच्या झुळकीसरशी स्पर्श करीत होते! मला गुदगुल्या करीत होते!
 
आल्हाददायक वातावरणातल्या, हवेने ही करामत केली होती!
बसल्या बसल्याचं माझं मन हवेच्या एकएका तरंगावर तरंगू लागल होत!...                
'फुलं फुलांच्या बगीच्यामधूनी
ओठ टेकविले होते गाली !

उडती सुळसुळ केस भुरभुर
पाहुनि माझी फसगत झाली!

गंध वाहतो नासिकेतूंनी
 मजला मंद धुंद आली!

स्पर्शूनी तव फुलफुलांना 
माझी नजर फिरते गाली!'..........

 बंधू-भगिनींनो!
हवा,वायू ,वात हे आहेत तरी काय ?' मनुष्य जीवनाशी खेळ खेळणारी!डोळ्याला न दिसणारी!तरी ही अस्तित्व दाखवणारी ती जाणीव आहे!सजीव सृष्ठीशी एकरूप झालेल प्राणतत्व आहे ते!
बाळ जन्मल्या नंतर नाळ कापली जाते!त्याचा पहिला आवाज येतो 'ट्याह्ह!कांह!कांह!'असा!
बाळाच्या मुखातून प्राणवायू प्रकट झालेला असतो!आवाजात प्राणत्व असतं!
मातेच्या उदराकडून बाळाचं वसुंधरेला ,या नवसृष्टीला दान दिले जात!बाळाच्या जन्मवेळेस मातेला श्वास रोखून कळ देत कुंथाव लागत!
श्वास रोखून धरल्याने प्राणवायूच रोधन होत असतं!

 मातेसारखीच माया वसुंधरा लावत असते!स्वतःकडे असलेला प्राणवायू जन्मल्या बाळाला देत असते!आपण बाळाचे कान फुंकतो म्हणजे काय करतो? तर त्याच्या कानातील मळ,घाण निघून जावा!सदविचारांचे!आचारांचे मुबलक ज्ञान त्याच्या कानातुन मनात जावे म्हणून कान फुंकण्याची ही प्राचीन भारतीय परंपरा असावी!

जीवन दानाच!प्राण दानाच! पाहिलं कर्तव्य सृष्टी पार पाडत असते!मानवी जीवनाची सुरुवात अन शेवट प्राणवायूनेच होत असते!ईश्वराने दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे!

माणूस जेवना शिवाय वीस एक दिवस राहू शकतो!पाण्याशिवाय चार-पाच दिवस राहू शकतो! प्राणवायू शिवाय काही सेकंदच राहू शकतो!
योगासनं करणारी व्यक्ती पाच सात मिनिट प्राणवायू रोखू शकते!अट्टल पोहणारा व्यक्ती ही आपला दम काही मिनिटे रोखू शकतो!

प्राण म्हणजेच धगधग!
प्राण म्हणजेच धुगधुगी!
प्राण म्हणजेच आपल्या हालचालींची जाणीव आहे!
हवा अन प्राणवायू फुकटात आहे!मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे!माणसाचा 'प्राण' वाचावा म्हणून त्याला दवाखान्यात 'आय सी यू' युनिट मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवल जातं!

माणसाला कधी कधी अति गर्व होतो!दुसऱ्याने हवा भरल्याने फुगतो!त्याच्या दृष्टीने इतर सर्व तुच्छ असतात!भासतात!बाहेरची हवा लागली की व्यक्ती हवेत उडायला लागतो!हा नैसर्गिक स्वभाव आहे मानवी जीवनाचा!..........

'पंख लावूनी हवेत उडतो
मजला गगन झाले ठेंगणे!

 कधी तरी खाली येणे
 तुम्हांसी आहे सांगणे!'.....

 गर्वाचा फुगा फुटला की मनुष्य जमिनीवर येत असतो..!

'नकोच फुगवू पोकळ छाती गर्वाने होईल खाली!    

 हवाच भरली दुष्मनानी
कोणी राहिला ना वाली!

जोवर आहे दम धमनीत
घाव झेलण्या तयार ढाली!

श्वासांनी रंगविला हा खेळ
लावली ओठांवरती लाली!'.....

..... सृष्टी निर्मात्याने!त्या ईश्वराने! श्वास देणे-घेणे आपल्या हाती ठेवले आहे!सतकर्म...श्वासांच योग्य अंतर ठरवत असतं!
प्राण अर्थात प्राणवायू या धरेवर!या सृष्टीवर नसता तर जीवसृष्टीच अस्तित्वचं राहिलं नसतं!

संपूर्ण विश्वाची निर्मिती ही आकाश!आप!तेज!वायू आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनी झालेली आहे!पंचमहाभूतांपैकी वायूचं स्थान अतिशय महत्वपुर्ण आहे!
हवा,वारा,वादळ ही त्याची इतर रूपे आहेत!

कधी कधी वातावरणातील बदलामुळे भौगोलिक वादळ उठतं असतं!मानवी जीवनात सुद्धा अनेक वादळे उठतं असतात!कधी शांत होतात!
कधी उध्वस्त करतातं!तर कधी कधी अस्तित्व पुसून टाकतो!म्हणतो ही!....

'माझ्या समोर येण्याची कोणाची
 हवा आहे का?'
इतरांची हवा काढणारा!दुसऱ्यात हवा भरणारा माणूस हवे शिवाय जगूच शकत नाही!राहू शकत नाही!
वैज्ञानिक दृष्टिकोन अन अध्यात्मिकता यांची सांगड घालण्याचा माणूस प्रयत्न करीत असतो!

 बंधु-भगिनींनो ! 
बाळ मोठं झालं की त्याला बाहेरची हवा लागते!घरातलं स्वछ वातावरण त्याला कमी पडत!बाहेरची हवा खावीशी वाटते!थोडक्यात काय तर वातावरणाच्या पोकळीतून बाहेर पडल्यावर बाहेरचे चांगल्या-वाईटाची पारख होत असते!माणूस नव-नवीन खूप काही शिकत असतो.बाहेरची हवा लागल्या शिवाय जगणं ही कळत नसतं!

आपल्याला कधी कधी उचकी लागते!उचकी ही शारीरिक क्रिया आहे!कोणीतरी आपली आठवण काढली आहे या श्रद्धेशी जोडुन आपण नामा निराळे होतो!कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या मनात कोणीतरी फुगवून उलटीसुलटी हवा भरीत असतो!त्या हवेने नात्यात विसंवाद अन कटुता निर्माण होते!कोण कोणाच्या मनात कसली हवा भरेल ते सांगता येत नसत!मग क्रोधाच्या हवेने परिसीमा गाठली जाते!
 
बंधूंनो !...रबराच्या टायरमध्ये हवा भरून गाड्या पळत असतात! तसेच माणसाचं आहे!उलटी सुलटी हवा भरली की ती डोक्यात जाते!मुखावाटे रागाने बाहेर पडते!त्याची परिणीती भांडणात होते!टायरच्या ट्यूब मध्ये हवा भरली की वाहने रस्तोरस्ती पळताना दिसतात!हवा निर्जीव वस्तूत भरली की सदपयोग झाल्याचं समाधान मिळतं असतं!सदविचारांचा वारसा चालविण्यासाठी माणसाने स्वतःच्या डोक्यात गेलेली हवा काढून टाकणे समाजहिताचे असते!मुलगा कॉलेजमध्ये जायला लागला!एखादया मुलीची ओढणी हवेच्या झुळुकीने त्याला स्पर्शून गेली की तेथेच दोघांनाही पहिल्या प्रेमाची चाहूल लागते!.....

'कधी होतो पतंग मी
दूर आकाशी जातो!
हवेत उडतांना माझ्या
 सखीलाच पहातो!
अन...अन..अन
उडत्या ओढणीचा स्पर्श
हळूच ओढून घेतो!' 

मध्यस्थ म्हणून दोघांमध्ये हवेनेचं कार्यभार पाहिलेला असतो!मग दोघेही हवेच्या वेगाने गाडीवर बसून दूर निघूनही जातात!माणस कित्येकदा हवेत उडत असतात!अत्यानंदाचा तो परिपाक असतो!त्यांना समज दिली जाते!......कशी ते बघा.......
'जास्त उडू नकोस!
येशील पटकन खाली!'

आपले श्वास चालू आहेत हे जिवंतपणाच लक्षणं आहे!शेवटी-शेवटी तर आपण जिवंत आहोत की नाही म्हणून आपल्या नाकासमोर सुताचा धागा धरला जात असतो!इतकं महत्व प्राणवायूला असतं!श्वासातील!हृदयातील!स्पंदन प्राणपणाने लढत असतात!श्वास म्हणजेच आपल्या नासिकेद्वारा हवा आत घेऊन पुन्हा सोडण्याची क्रिया असते!जीवनाच्या अंतापर्यंत श्वास-उतश्वास चालूच असतात!
अशुध्द आचार विचारांची हवा बाहेर सोडणे आणि सदाचाराची शुद्ध हवा घेत राहणे!.. हाच अतिमहत्वाचा धागा त्या पाठीमागे असावा!

मैदानातील मल्ल कुस्ती खेळताना स्वतःचा दम वाढवतं असतो!कुस्तीतसुद्धा शक्ती बरोबर दम टिकवून ठेवणे!...श्वास धरून ठेवणें महत्वाचे असतें!

'तोच जिंकतो!
तोच टिकतो!
जो दम टिकवून ठेवतो!'

जापनीज कुंफ़ू खेळात श्वास रोखून सगळी शक्ती हमला करण्यावर वापरली जाते!
प्राणतत्व आपल्या देहात कार्य करीत असत!त्याचा उपयोग सकारात्मक गोष्टींसाठी करायचा कि नकारात्मक हे स्वतः ठरवायचं असतं!आपल्या शरीरातील हृदयाची!...फुफुसांची धगधग अविरत चालूच असते!ते बंद पडले की माणसाचं देहावसान होते!म्हणून हृदयाचं पंपिंग शरीरात सतत चालू असत!चोवीस तासांचा पाढा सतत चालूच असतो!दिवसातून, चोवीस तासातून आपण जवळपास २१६००वेळा श्वासोश्वास घेत असतो!हे उत्तम आरोग्याचं लक्षण मानल जात!
मंत्रपठण आणि आरतीने प्राणवायू नियंत्रांचे कार्य होत असावं असं वाटतंय!

बंधू-भगिनींनो!
मानवी जीवनाच्या अंतिम प्रवासाच असंच आहे!मुळात प्राणवायू शिवाय जीवन व्यर्थ आहे!आयुष्यभर फुकटात मुबलक प्रमाणात मिळालेला प्राण वायू सोडून कधीकधी महागड्या व्हेंटिलेटरवर शेवटची घटिका मोजीत प्राण सोडणारे आपण पाहिले असतील!
प्राणपणाने लढण्यासाठी प्राण वायू अत्यावश्यक असतो! मेलेल्या माणसासमोर जळणाऱ्या दिव्याला सुद्धा प्राणवायू लागत असतो!प्राण वायू कमी पडला तर दिवा ही विझतो!

 विस्तवाला प्रज्वलीत करण्यासाठी आपल्या मुखातील हवाच लागते!मनामनातील आग पेटविण्यासाठी आणि विझविण्यासाठी हृदयातील शुद्ध हवाच लागते!
वायूने आपलं आयुष्य सर्वत्र व्यापल आहे!गरम झाल्यावर फॅनच्या पंख्यातील हवा खावी लागते!पवनपुत्र हनुमान वायू वेगाने श्रीलंकेत उतरले होते!....रामायणात तसा उल्लेख आहे!म्हणून लिहावंसं वाटतं!...

' पवनपुत्र हनुमान उडाले!
लंकेश्वर भयभीत झाले!

पाहुनि लंका सोनेरी!
वायूपुत्र अचंबित झाले!

पाप करोनि सोने मडवी!
लंका शेपटीत जळाले!
अन अन अन.......
असुर भयभीत झाले!' 

हवा अन वायू शिवाय आपलं जीवन नाही ......

'कोणी घेतसें प्राण!
कोणी देतसे प्राण!

प्राणपणाने लढूनि
झुलवित असतो प्राण!

कधी उठते वादळ भयाण!
उडती मोठे अन लहान!

विपरीत घडोनि जाते तेव्हा!
म्हणती गेला प्राण!'

 कंठाशी येतो प्राण!
तेथे असत जीवन महान!'

बंधू-भगिनींनो!
पुन्हा भेटूया पुढील पुष्पांसोबत.
🌷🌷🌷🌷🌷🌷🙏.... 

#नानाभाऊ_माळी,
 #साहित्यसम्राट, हडपसर,* पुणे-४११०२८
मो.न. ९९२३०७६५००/७५८८२२९५४६
दि.१८ऑक्टोबर२०२०

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)