उन्हाळ्या नंतर पावसाळा
🌹उन्हाळ्या नंतर पावसाळा🌹
****************
...नानाभाऊ माळी
🌷🌷🌷🌷🌷🌷
बालपण नटखट असतं!सर्व काही झटपट असतं!बाल मनात बालपण नाचत असतं!खट्याळ असतं!विशेषतः हट्टी असतं!पाहिजे ते मिळविण्यासाठी मुखातल्या शब्द शक्तीने ओरडून ओरडून हिसकावून घेण्याची जिद्द असते!थोडक्यात बालपण निखळ, चंचल असतं!पाण्यासारख स्वच्छ असतं!कुविचारांच्या स्पर्शापासून बालपण कोसो दूर असतं!🌷
कपटीपणाला बाल वयात कुठेच जागा नसते!थारा नसतो!बालपण कृष्णासारख मनसोक्त खेळतं असतं!बागडतं असतं!हट्ट करणे हा मूळ स्वभाव असतो!ओरडल्या शिवाय मिळतं नाही ही पक्की समज असते!बालपण दुखापासून दूर असतं!कष्ट आणि जबाबदारी पासून लांब असंत!बालपण स्वच्छंदी असतं!उमलणाऱ्या कळी सारखं असतं!हसऱ्या फुलणाऱ्या फुलासारख असतं!🌹
बंधू-भगिनींनो!बालपणीच्या सुंदर जगाची अनुभूती जवळपास प्रत्येक व्यक्तीला झालेली असते!चौदा विश्व दारिद्रय ज्या घरात असतं तेथेही बालपण अगदी आनंदी गेलेलं असतं!बालपणी दुःखाची जाणीव थोडया प्रमाणात होत असते!बालपणी गरजा तरी किती असतात? पोटाची भूक भागवली की झालं!आनंद गगनात मावत नसतो!त्रासातून, कष्टातून पालक अन्न,वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था करतातचं! विस्तारलेल्या अफाट गरजांची गरजचं नसते!🌷
बंधू-भगिनींनो!सांगावस वाटतंय कुटुंब जर मोठे असेल!खाणारे नऊ-दहा असतील, कमविणारे एक-दोन असतील!त्यात गरीबी-दारिद्र्य जर जबडा उघडून उभे असतील तर?बालपणी,कमी वयातचं ते चटके बसायला लागतात!बालपण भुर्रकन उडून जातं!बालपण आपोआप पिटाळलं जातं!परिस्थिती बालपणास बाहेर हाकलीत असतें!कोवळ्या वयातचं अतिसमज येते!थोराडपण येतं असतं!पोटाची खळगी बालसुलभ खट्याळ मनाला चटका लावून जात असतें! दररोज जबाबदारीच्या जाणिवेने उद्याचा सूर्य उगवत असतो!कोवळेपण खोडून चटका देत राहतं!बालपण दिसेनासे होतं!🌹
बंधू-भगिनींनो!आमच्याही घरात आम्ही सात भाऊ,चार बहिणी आणि आई-वडील असे १३जन होतो!आम्ही मामांच्या गावी म्हसाळे ता.साक्री,जि.धुळ्यात राहतं होतो! आई-वडिलांची कमाई म्हणजे छकडा बैलगाडीतं व्यवस्थित भाजीपाला रचून खेडोपाडी-गल्लोगल्ली फिरून विकायला जाणे होतं!उन,वारा,पाऊस या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता! कधी कधी शेताच्या कामावर मजुरीला जाणे सुद्धा होतं!🌷
दिवस थांबत नसतात!दिवस पळत असतात!काळ वेळेप्रमाणे आपली चाकं फिरवीत असतो!आई-वडील सर्वांची पोटं भरत होती!रोगराईला तोंड देत दोन भाऊ आणि दोन बहिणी एक एक करीत परत न येण्याच्या बोलीवर काळाच्या पडद्याआड निघून गेलीत!चौघेजन रोगराईचे बळी ठरले!हातावरचा संसार सांभाळीत,पोटाला चिमटा देत!आई-वडील स्वतः कधी कधी अर्धपोटी राहून मुलांना खाऊ घालत होती! आम्हाला शाळेत पाठवीत होते!आम्हा भावंडांना शिकवीत होते!छावडी धारणावर काम करून मोठी भावंडं देखील घराला मदत करीत होती!पोटासाठी कष्ट करीत होती!🌷
मोठया कष्टाने दोन्ही मोठी भावंडे शिकून नोकरीला लागलें!हा दिवस उन्हातील सावली भेटल्याचा होता!आनंदाचा होता!आई-वडिलांना आर्थिक साथ मिळाली होती!आधार मिळाला होता!आम्ही लहान सर्व शिकत होतो!माहेरी म्हसाळे ता साक्री जि.धुळे येथे येऊन आईने कष्ट केलेतं!वडिलांनी घाम गाळला! आम्ही लहान शिकत होतो!मामांच्या गावी सातवी पर्यंतच शाळा होती!..पुढे आमच्या गावाला शिंदखेडा जि.धुळे येथे आलो!आमचं घर आणि शेती दुसऱ्याकडे गहाण टाकले होते! नंतर ते मोठ्या भावांनी सोडवून घेतले होते!🌷
कष्टाची परीक्षा सुरू होतीचं!आम्ही लहान भावंड सुटीतं शेतावर मजुरीने कामाला जात होतो!आई-वडीलांचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत होतो!त्यांना हातभार लावीत होतो! शाळेत शिकत होतो!आमचं शेत फक्त तीन एकर!..त्यात काय पोट भरणार होत?मोलमजुरी शिवाय पर्याय नव्हता!शिक्षण सुर्यदेवाचं रूप असतं!उजेड दाखवून मार्ग दाखवीत असतं!ज्ञान मार्ग दाखवीत असतं!अंधकारास पिटाळून लावीत असतं!बहिणींची लग्न झाली होती!मोठ्या भावांचे लग्न झालेतं!काळ पळत असतो!आपण सुखाच्या शोधात पळत असतो!सुख शोधित असतो!🌷
हळूहळू शिंदखेड्यातील आमचं घर रिकामे होत गेलं!आम्ही घरट्यातील पाखरे गाव सोडून पोटासाठी दूर निघून गेलोत!त्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता!वडिलांचे मार्च १९८० साली गुडीपडव्याच्या दोन तीन दिवस आधी निधन झाले होते!एका श्रमाने,कष्टाने कायमची विश्रांती घेतली होती!देह ठेवला होता!आयुष्य वाचलेल्याची इतिश्री झाली होती!सुखाच्या जवळी जात असतानाच!हक्काचा आधार राहिला दूर निघून गेला होता!आम्ही पोटाची खळगी भरण्यासाठी शिंदखेडा सोडले!आईला झालेलं दुःख डोंगराहून मोठ होतं!जगणं थांबत नसत!काळ थांबत नसतो!चढ- उतारांच्या खाच खळग्यातून मार्ग काढीत आपलं जगणं सुकर करीत असतो! अपार कष्टाचं फळ मिळत असत हे मात्र सत्य आहे!🌷
लहानपणीच्या रोगराईला तोंड देत पाच भाऊ आणि दोन बहिणी जगलो-वाचलो होतो!आई-वडिलांच्या पुण्याईने आता आम्ही दोन्ही बहिणी सहित सर्वजण पुण्यात स्थायिक झालेलो आहोत!विशेष म्हणजे आता सर्वांनाच नातवंड आहेत!आई सारख्या महान दैवताचे आशीर्वाद अजूनही आमच्या डोक्यावर आहेत! घेत आहोत!वयाच्या ९६व्या वर्षी देखील आईचा ममतारुपी हात अजूनही आमच्या सोबत आहे!आईचे सतत आशीर्वाद घेत आहोत!थोरले भाऊ ७५ व्या वर्षी अजूनही नवतरुणाला लाजवतील असे कार्य करीत आहेतं!जगणं सुंदर आहे!थोडं कष्ट आहेत!थोडा त्याग आहे!गालात हासू आहे!डोळ्यात आनंदाश्रू आहेत!अहो.. नाते, मानव समाज हे आमचे गुरू आहेत!मार्गदर्शक आहेत!त्यांचा बोट धरून आपण चालत राहू ईश्वरास शरण जाऊ!त्याची कृपा असे तोवर आनंदी श्वास घेत राहू!हिच जाणीव सतत ठेवून जगतो आहोत!आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आनंदित आहोत!
🌹**************🌹
.....नानाभाऊ माळी,
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे,
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२२ऑक्टोबर२०२१
Comments
Post a Comment